एलईडी मासेमारी विरोधात शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन…

531
2
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. १८ : कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर अन्याय होत आहे. यामुळे एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा. सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्यविभागाला शासनाची गस्तीनौका मिळावी व अवैधरित्या केल्या जाणाऱ्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी शासनाने कडक कायदा अंमलात आणावा यासाठी शिवसेना आमदारांनी मुंबई येथे अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन छेडले.
यावेळी आमदार वैभव नाईक, आमदार अशोक पाटील, आमदार रमेश लटके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुभाष भोईर आदी उपस्थित होते. यावेळी एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे, पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन शिवसेना आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले.
कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीचे प्रमाण वाढतच आहे. मोठमोठ्या बोटीमधून २५ ते ३० एलईडी लाईटच्या प्रखर प्रकाशाच्या साहाय्याने माशांच्या डोळ्यावर परिणाम करून ही मासेमारी केली जात आहे. कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात या ठिकाणच्या मोठमोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. अशा प्रकारच्या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मासळीची लूट होते. यामुळॆ पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. ही मच्छीमारी अशीच सुरु राहिल्यास भविष्यात समुद्री मासे नष्ट होणार असून पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मच्छीमार उदध्वस्त होणार आहे. यामुळे ही एलईडी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवा ही आमची भूमिका असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.