जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक एकवटले; २५ जूनला आझाद मैदानावर मोर्चा…
सिंधुदुर्गनगरी ता. १८: कोकणातील पर्यटन व्यावसायिकांवर आजपर्यंत अन्याय झाला असून सीआरझेड कायद्यासह अनेक प्रश्न व्यावसायिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे २०१९ पर्यंतची सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करावी. स्वतंत्र कोकण पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन समृद्ध कोकण संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सादर केले. तसेच पर्यटन व्यवसायिकांच्या विविध मागण्यांसाठी २५ जून रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा ईशाराही यावेळी दिला आहे.
समृध्द कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी राजन तेली, संग्राम प्रभुगावकर, जेरॉन फर्नांडिस, बाबा परब, हरी खोबरेकर, देवानंद लोकेगावकर, अविनाश सामंत, भाई केळूसकर आदि पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकानी केलेली बांधकामे शासनाने सीआरझेड अंतर्गत अनधिकृत ठरवून ती तोडण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. ही कारवाई रोखण्यासाठी व अन्य पर्यटन विषयक प्रश्नांबाबत महाराष्ट्र शासनाकडे दाद मागण्यासाठी जन आंदोलनाची गरज आहे. किनारपट्टी भागातील नागरिक गेली अनेक वर्ष पर्यटन उद्योगात आहेत. मात्र शासन येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसाठी कायमच उदासीन राहिले आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण संघटनेतर्फे लढा पुकारला आहे. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग आणून देणे गरजेचे आहे. अनेक वेळा सरकारचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाल्याने आता सरकार व्यावसायिकांच्या आत्महत्येची वाट बघत आहे का ? असा सवाल पर्यटन व्यवसायिकांनी यावेळी केला आहे. तसेच २०१९ पर्यंतची सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करणे. स्वतंत्र कोकण पर्यटन प्राधिकरण निर्माण करणे. पर्यटन उद्योगाला भरघोस आर्थिक सहाय मिळविणे. भूमिपुत्राना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या मिळणे आदी पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्याचे निवेदनही सादर करण्यात आले.