सेवा सुधारा : अन्यथा राष्ट्रवादी केव्हाही घालणार घेराव
वेंगुर्ले : ता.१९
अजून पावसाला व्यवस्थित सुरुवात झाली नसून वीज वितरण व बीएसएनएल या विभागांचा गचाळ कारभार जनतेच्या समोर आला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे संबंधित विभागांनी याबाबत योग्य नियोजन करून यंत्रणा राबवावी अन्यथा पूर्वसूचना न देता वेंगुर्ला तालुक्यातील संबंधित विभागांना ग्राहक व नागरिकांना सोबत घेऊन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घेराओ घालण्यात येणार. यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला वीज वितरण व बीएसएनएल विभाग सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम के गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
वीज वितरण विभागाला वैयक्तिक संपर्क साधून विनंती केली असता कोणताही उपयोग होत नाही. पावसाळ्या पूर्वीच वीज वितरण चा गचाळ कारभार उघड झाला आहे. सरकारच्या अच्छे दिन मध्ये ठेकेदारांना अच्छे दिन आले असून लोकांना मात्र याचा फटका बसला आहे. २०१४ च्या तुलनेत सध्या वीज बिले दुप्पट झाली आहेत. पूर्वी वीज वितरण कडे स्वतःचे कर्मचारी असताना पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व झाडी तोडून वीज यंत्रणा ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असायची. मात्र आता सर्वच कामे ठेकेदार पद्धतीने होत असल्याने पावसाळ्यापूर्वी करायची कामे होत नाहीत. एखाद्याला वीज मीटर घ्यायचं असल्यास कंपनीकडे फार मोठे डिपॉझिट भरावे लागते त्याबदल्यात वितरण कंपनी फक्त मीटर देणार व उर्वरित सर्व कामे ग्राहकांनी करायचे आहेत. अजूनही कोकणात पावसाला सुरुवात झाली नाही तरीही दहा-दहा तास वीज गायब होत आहे. तर अधिकारी आउट ऑफ रेंज आहेत. पूर्ण दिवसात कमीत कमी पंधरा ते वीस वेळ विज येणे-जाणे प्रकार सुरू असतो. विजेचा दाब अनियंत्रित झाल्याने कॉम्प्युटर, फ्रिज यासारखी साधने जळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. एकंदरीत वीज वितरणच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नाही. शासन फक्त अच्छे दिन आणि सुशासन याचे नारे वाजवत आहेत. मात्र शासनाच्या या यंत्रणेत सुसंगतपणा दिसत नाही. असे आरोपही गावडे यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे बीएसएनएलचे दुखणे यापेक्षाही वाईट आहे. टॉवर खालीसुद्धा नेटवर्क मिळेल याची शाश्वती नाही. याला फक्त कर्मचारी जबाबदार नसून अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण बीएसएनएलच्या कंत्राटदार कामगारांचा प्रश्न अनेक वर्षे अधांतरीच आहे. शासनाची बीएसएनएल यंत्रणा संपुष्टात आणून अंबानीच्या जिओ साठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्रशासनाचा अंकुश बीएसएनएल वर नाही. आता शासनाला अर्ज विनंती याचा अर्थ समजत नसल्यामुळे त्यांच्याच भाषेत लोकशाही मार्गाने त्यांना उत्तर देण्यात येईल. यामुळे पुढील काळात संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून आपली यंत्रणा न राबवल्यास सर्व ग्राहक व नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील वीज वितरण व बीएसएनएल विभागांना घेराव घालण्यात येईल असा इशारा एमके गावडे यांनी दिला आहे.