विधानसभेला काँग्रेस तिन्ही जागा लढणार

105
2

राजन भोसले; लोकसभेचा पराभव विसरून कार्यकर्ते कामाला लागले

सिंधुदुर्गनगरी ता.१९:लोकसभेला आम्ही कमी पडल्याने आमचा पराभव झाला. मात्र, हा पराभव विसरून व त्यावेळच्या चुका सुधारून आम्ही विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री भोसले यांच्यासह माजी आमदार तथा जिल्हा प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, लोकसभेचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, काका कुडाळकर, सोमनाथ टोमके, सर्फराज नाईक आदी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसची नियोजन बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. तिन्ही जागांसाठी उमेदवारांची मागणी आली असून केंद्रीय समिती यावर निर्णय घेणार आहे. काँग्रेसने पुढील दोन महिन्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनी निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात जाऊन प्रचार यंत्रणा राबविणार आहेत. यामाध्यमातून जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा आमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी भोसले यांनी सांगितले.

4