राजन भोसले यांचा गौप्यस्फोट:लोकसभेत वाढलेली मते आमचीच
सिंधुदुर्गनगरी ता.१९: लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खूप प्रयत्न केले.असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी आज येथे केला.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मिळालेली मते ही काँग्रेसची आहेत.राणेंनी काँग्रेस सोडली हे अनेकांना कळले नाही त्यामुळे त्यांच्या मतात वाढ झाली.ही वस्तुस्थिती आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार राणे काँग्रेसचे आमदार आहेत, असे विचारले असता भोसले यांनी त्यांनी काँग्रेस कधीच सोडली, असे सांगितले. यावर त्यांच्यावर कारवाई का करत नाही ? असा प्रश्न केला असता ‘कारवाई करून त्यांना मोठे का करावे ? तसेच त्यांना आम्ही पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलवत नाही.’असे भोसले यांनी सांगितले.स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष भाजपचे खासदार आहेत. तर भाजपचे ऐकत नाहीत. आ. राणे काँग्रेसचे आमदार असताना काँग्रेसचे ऐकत नाहीत. त्यांचे नेमके धोरणच स्पष्ट होत नाही, असा टोमनाही यावेळी भोसले यांनी लगावला.
यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपा सह स्वाभिमानला मत म्हणजे मोदी-फडणवीस यांना मत असे आम्ही मतदारांना समजावून सांगणार आहोत. महाराष्ट्रातील २८८ जागांवर आघाडी होईल. त्यात राष्ट्रवादीला अन्य जिल्ह्यात जागा जास्त मिळेल. सिंधुदुर्गातच जागा मिळाली पाहिजे, असा नियम नाही असे भोसले यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी सावंतवाडीमध्ये काँग्रेसला २७ हजार तर राष्ट्रवादीला ९ हजार मते मिळाली होती, याकडेही भोसले यांनी लक्ष वेधले.