ठिकठिकाणी झालीत पाण्याची तळी : कुडाळ नवीन बसस्थानकासमोर व्होल्वो रूतली
कणकवली, ता.19 ः महामार्ग ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या नियोजनशून्य कामामुळे मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. कुडाळच्या नवीन बस स्थानकासमोरील बॉक्सेलजवळ व्होल्वो बस रुतून बसली होती. तर कणकवलीत कोर्टासमोरील महामार्गावर तलाव निर्माण झाला होता. याखेरीज ठिकठिकाणचे रस्ते निसरडे आणि खड्डेमय झाल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागले.
सिंधुदुर्गात आजपासून मान्सून सक्रीय झाल्याने ठिकठिकाणी धुवांधार पाऊस झाला. तर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ओरोस येथील पिढढवळ पूल ते कुडाळच्या भंगसाळ पुलापर्यंतचा रस्ता अतिशय खड्डेमय आणि जीवघेणा झालाय. आज कुडाळच्या नवीन बसस्थानकासमोर गोव्याकडे जाणारी व्होल्वो गाडी चिखलात रुतून बसली. ती बाहेर काढण्यासाठी सुमारे चार तास मेहनत घ्यावी लागली.
कणकवली कोर्टासमोरील भागात तर तलाव निर्माण झाला होता. नेमका रस्ता कुठे आहे हेच समजत नसल्याने अनेक दुचाकीस्वार महामार्गावर साचलेल्या दोन फुट पाण्यात कोसळले. तर खारेपाटण ते कुडाळपर्यंतचा महामार्ग अनेक ठिकाणी निसरडा आणि खड्डेमय झाल्याचाही त्रास वाहनचालकांसह नागरिकांना सहन करावा लागला.