आज पासून दक्षिण कोकण,कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल…
पुणे ता.२०: ‘वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रतीक्षा अखेर संपली असून,आज दक्षिण कोकण,कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे.
अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून,समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने आज मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल झाला.त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सून पुण्यासह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे.
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला आहे. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन आजपर्यंत लांबण्याची यापूर्वीच वर्तविली होती. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली होती.आता मॉन्सूनच्या आगमनास बळकटी मिळाली आहे. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
वाढलेले वाऱ्याचे प्रवाह, समुद्राला उधाण येऊ लागले आहे. यातच किनारपट्टी भागात ढगांची दाटी झाली असून, कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात आजपासून पाऊस जोर धरणार आहे. तर रविवारपासून (ता. २३) मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.