पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ २६ जूनच्या बैठकीस जाणार…

137
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालंडकर-पराडकर यांची माहिती…

मालवण, ता. २० : राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी २६ जूनला मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीस लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलेल्या पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ उपस्थिती दर्शविणार असल्याची माहिती मिथुन मालंडकर व महेंद्र पराडकर यांनी दिली.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररीत्या केल्या जाणार्‍या एलईडी पर्ससीन नेटच्या मासेमारीविरोधात तांत्रिकदृष्ट्या कडक कायदा अंमलात आणण्यासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीस गृह व मत्स्य खात्याचे मंत्री, सागरी पोलिस प्रमुख, मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार्‍या मच्छीमारांच्या प्रतिनिधींना रामदास कदम यांच्या कार्यालयाकडून या बैठकीस उपस्थित राहण्याचे कळविले आहे. स्थानिक आमदार वैभव नाईक यांनीही याला दुजोरा देत तेही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनीही बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणुकीवर बहिष्कार घालणार्‍या पारंपरिक मच्छीमारांना केले. त्यामुळे बैठकीसंदर्भात चर्चा केल्यानंतर आठ ते दहा जणांचे शिष्टमंडळ या बैठकीस रवाना होणार आहेत.
पर्ससीन नेटद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी, एलईडी मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे राज्यातील सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना भीषण बेरोजगारीचा प्रश्न सोसावा लागत असून याप्रश्नी पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. पर्ससीन नेट आणि हायस्पीड ट्रॉलर्सच्या अवैध मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी शासकीय यंत्रणा कशाप्रकारे राबवली जावी याबाबतही सूचना मांडल्या जाणार आहेत. पारंपरिक मच्छीमारांना अपेक्षित असलेला न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार कायम ठेवण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील अनेक मच्छीमारांनी बहिष्काराला चांगला प्रतिसाद दिला आहे. विधानसभा निवडणुकीत हीच मते त्या-त्या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतील असा विश्वास श्री. मालंडकर व श्री. पराडकर यांनी व्यक्त केला. या बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयात मच्छीमारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचेही श्री. मालंडकर, श्री. पराडकर यांनी सांगितले.

\