मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा
मुंबई : “राज्यात एसएससीसह आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे.त्यासाठी कठोर कायदा करणार”,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
येत्या २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा अनिवार्य करावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रात मराठी शिकणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहिल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “काही शाळा विशेषत: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या काही शाळा याचं पालन करत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं आहे. यासाठी कायद्यात बदल करुन अतिशय कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात मराठी शिकणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहिल. कुठल्याही बोर्डाच्या शाळांना मराठी शिकवावं लागेल, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील.”