नियोजित आंदोलनापूर्वी कामाला सुरुवात
वेंगुर्ले ता. २०; २० तारीखपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याने दाभोली-खानोली-वेतोरे रस्त्याचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने भाजपाने पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. प्रत्यक्ष काम सुरु झाल्याने तिन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दाभोली-खानोली-वेतोरे या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बजेटमधून निधी मंजूर केला होता. मात्र,प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे वेतोरे सरपंच राधिका गावडे व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांची भेट घेतली होती. यावेळी २० जुनपूर्वी रस्त्याचे खड्डे बुजवीण्याचे काम सुरु न केल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. तसेच वेंगुर्ला पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांना सुद्धा त्याबद्दलचे निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान, १९ जुन रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाची दखल घेऊन वेंगुर्लेचे उपविभागीय अभियंता आवटी साहेब यांनी लिखित स्वरुपात काम सुरु करत असल्याचे कळविले आणि यंत्रसामुग्री आणुन कामाला सुरुवातही केली. सदरच्या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे २० जून रोजी पुकारलेले आंदोलन भाजपाने स्थगित केले. तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती स्मिता दामले, वेतोरे सरपंच राधिका गावडे, वेतोरे सोसायटी चेअरमन विजय नाईक, भाजपा तालुका उपाध्यक्ष दिपक नाईक,ग्रामपंचायत सदस्य सुधीर गावडे, विश्वनाथ गावडे,शिरी चेंदवणकर, नितीन गावडे, आपा गावडे,उपसरपंच नाना वालावलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.