खारेपाटण- चिंचवली रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर
मुंबई ता.२० : खारेपाटण- चिंचवली रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या सुख नदीवरील पुलासाठी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या कामासाठी ४ कोटी ९० लाख अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले.
चिंचवली-तिथवली दरम्यान सुख नदीवर पूल होण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी आणि सचिव सुर्यकांत भालेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली होती. यावेळी नितेश राणे यांनी या पुलाची किती आवश्यकता आहे, हे मंत्री महोदयांना पटवून दिले होते. चंद्रकांत पाटील यांनी लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांना या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात अर्थसंकल्पात या पुलासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले. आ. नितेश राणे यांच्या धडाडीमुळे वैभववाडी, राजापूर आणि कणकवली या तालुक्यातील व नियोजित खारेपाटण तालुक्यातील जवळपास 50-60 गावांचा खारेपाटण रेल्वे स्टेशनला येण्याजाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे मोसम, जामदा पूल हा मोठा वळसा टळला जाणार आहे. तसेच खारेपाटण, चिंचवली, कुरंगवणे, शेर्पे, बेर्ले, तिथवली, मठ, नानिवडे, कोळपे, ऊबर्डे वेंगसर, आजीवली इत्यादी गावातील लोकांना फायदा होणार आहे. खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीने आ नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.