गडनदीपुलालगतचा भराव खचला…नागरिकांनी वाहतूक रोखली : प्रांत, पोलिसांची ठेकेदाराला तंबी

663
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवली, ता.20 : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरालगतच्या गडनदी पुलालगतचा मातीचा भराव खचला. यामुळे महामार्गावरून जाणारी वाहने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. अखेर कणकवली पोलिस तसेच प्रांताधिकारी घटनास्थळी धाव घेतली. ठेकेदाराला तातडीने तेथे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर येथील रास्ता रोको मागे घेण्यात आला.
कणकवली शहरालगतच्या गडनदीपात्रात दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने एका नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण केले. तर दुसर्‍या पुलाचे काम सुरू आहे. या पुलालगत मे महिन्यात मातीचा भराव टाकण्यात आला होता. गेले काही दिवस होत असलेल्या पावसाने हा भराव खचत चालला होता. आज सायंकाळी सहा नंतर तर या भरावाला मोठे भगदाड पडले. त्यामुळे गडनदी पुलावरून जाणारी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी गडनदीपुलावरच रास्ता रोको सुरू केला. ही माहिती कळताच पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते, तहसीलदार संजय पावसकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराच्या प्रतिनिधींना तातडीने बोलाविण्यात आले. तसेच त्याची खरडपट्टीही काढण्यात आली. यावेळी ठेकेदाराच्या प्रतिनिधीने एका रात्रीत हा भराव पुन्हा करून देण्याची ग्वाही दिली. तसेच गडनदीपुलालगत सुरक्षा उपाययोजना करण्याचीही ग्वाही दिली. यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, वागदे येथील संदीप सावंत यांच्यासह कणकवली, वागदे, हळवल गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\