उधाणाच्या पाण्याने पाल येथे शेती बागायतीचे नुकसान

204
2
Google search engine
Google search engine

बंधाऱ्यांची उंची वाढविण्याची ग्रा.प.ची मागणी

वेंगुर्ले : ता.२१ ; अलिकडे समुद्रात आलेल्या उधाणामुळे खाडी शेजारील असलेल्या बंधाऱ्यावरुन शेती बागायतीत पाणी घुसल्याने पाल गावातील शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाल गावातील बंधाऱ्यांची उंची वाढविणे व मोऱ्या दुरुस्ती करणे अशी मागणी पाल ग्रामंपचायतीने प्रादेशिक बंदर अधिकारी, खारलॅण्ड विभाग व तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी समुद्रात ‘वायू‘ वादळ निर्माण झाले होते. या वादळामुळे समुद्राला आलेल्या उधाणाचे पाणी पाल गावातील गोडावणेवाडी, वादळवाडी व खाजणवाडी खाडी शेजारी असलेल्या बंधाऱ्यावरुन शेती बागायतीत घुसले. त्यामुळे येथील शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. तसेच पिण्याचे पाणीही मचूळ झाले आहे. तरी संबंधीत विभागाने याठिकाणी पहाणी करावी आणि पाल गावातील बंधाऱ्यांची उंची वाढवून मोऱ्यांचीही दुरुस्ती करावी. दरम्यान ग्रा.प. सरपंच श्रीकांत मेस्त्री, सदस्य वासुदेव बर्वे तसेच ग्रामस्थ रवींद्र गावडे, दीपक गावडे, सुनील गावडे यांच्यासह अन्य ग्रामस्थानी सदर बंधाऱ्यांची पाहणी केली. तसेच प्रादेशिक बंदर अधिकारी, खारलॅण्ड विभाग व तहसिलदार यांच्याकडे सदर कामे तत्काळ करावीत अशी लेखी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.