आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यास अखेर यश…
मालवण, ता. २१ : देवबाग, तारकर्लीतीळ समुद्र किनारपट्टीची होणारी धूप रोखण्यासाठी देवबाग ते तारकर्ली या भागातील समुद्रात जिओ ट्यूब टाकण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. सीआरझेडच्या परवानगी अभावी हे काम रखडले होते. मात्र आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामास अखेर मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच जिओ ट्यूब टाकण्याच्या कामास सुरवात होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
समुद्री उधाणाचा तसेच उसळणार्या लाटांचा जोरदार तडाखा किनारपट्टी भागात बसत आहे. परिणामी देवबाग किनारपट्टीवरील जुना बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविली जाईल अशी ग्वाही आमदार नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिली होती.
जिओ ट्युबच्या कामाबाबत आमदार नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून देवबाग येथे बंधारा दुरुस्तीचे काम मंजूर करून घेतले. किनार्यावर धडकणार्या लाटांचा वेग कमी होऊन किनारपट्टीची धूप रोखली जावी यासाठी समुद्रात जिओ ट्यूब टाकण्यासाठी २ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच हे काम सुरू होईल. त्याचबरोबर संपूर्ण देवबाग किनारपट्टीवर नव्याने बंधारा उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.