वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवणार : एम. के. गावडे

277
2
Google search engine
Google search engine

 

आश्वासनांची पुर्तता न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोक कंटाळले

वेंगुर्ले (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्चितपणे लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहिर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच मित्रपक्षांच्या सहकार्याने या मतदार संघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे नेते तथा प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सत्ताधाऱ्यांनी या मतदार संघात गेल्या ५ वर्षात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. लोकांची दिशाभुल करण्यासाठी केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या परंतू त्याची पुर्तता न करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना लोक कंटाळले आहेत. लोकसभेच्या निवडणूकीप्रमाणे विधानसभेची निवडणूक केवळ मोदींच्या नावावर चालणार नाही. कोकणातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात काहीच केलेले नाही ही बाजूच आम्ही पक्षाच्या माध्यमातून तळागळातील सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहचवणार आहोत, असे श्री. गावडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, माजी जिल्हा बँक संचालक नितिन कुबल आदि उपस्थित होते. श्री. गावडे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या राजवटीत जे झाले नाही ते आम्ही पाच वर्षात करु असे आश्वासन या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सांगत होते शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार, दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार, डिझेल-पेट्रोलचे भाव कमी करणार अशा एक ना अनेक घोषणा केल्या मात्र एकही घोषणा पूर्ण करु शकले नाहीत. उलट गॅस दरवाढ, वीज बिल डबल,शासनाचे उत्पन्न वाढवण्याच्या नावावर जमिनीचे दर अनेक पटीने वाढले त्याचे परिणाम दराच्या पटीत शेतकऱ्याकडून शेतसाऱ्यांची वसुली केली जात आहे.
सिंधुदुर्गात दूरसंचार सेवा कोलमडलेली आहे, याच्या मागे केंद्र शासनाचा कट आहे. ही सेवा बरी नाही म्हणून जीओ घ्या असे सरकारला सुचवायचे आहे. या धोरणामुळेच सध्या दुरसंचार मधील नोकर भरती स्थगित ठेवली आहे. ठेकेदार पध्दतीने काम करणाऱ्यांचे पगार दिले जात नाहीत.
सन २०१४ व आजच्या वीज बिलामद्ये खुप तफावत असून बीले भरमसाठ येत आहेत. मात्र त्या बदल्यात वीज सेवा दर्जेदार दिली जात नाही. दिवसातून पंधरा ते वीस वेळा वीज गायब होत असते याचा परिणाम जिल्ह्यातील छोट्या उद्योग धंद्यावर होत आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडवू असे सांगितले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील काहि भागात आजही टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. विदर्भात हजारो कोटी रुपये पाण्यासाठी खर्च होत असताना सिंधुदुर्गातील टाळंबा सारख्या धरणांना निधी उपलब्ध नसल्याने हे प्रकल्प रखडले आहेत. सत्तेतील मंत्री दर महिन्याला नवीन नवीन घोषणा करत आहेत. बाजूने शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाचा बट्याबोळ केलेला आहे. परंतू या खोट्या आश्वासनांवर आता कोकणातील जनता विश्वास ठेवणार नाही. देशा समोर देशाची घटना वाचवण्याची वेळ आली आहे. घटनाबाह्य निर्णय घेऊन त्यांना गोंडस नाव दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांच्या धोरणा विरोधात सध्या कारभार सुरू आहे. ७२ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्याची घोषणा सरकारने केली पण आपल्या जिल्ह्यातील सात लोकांनाही नोकरी मिळाली नाही हे दुदैव. या सरकारच्या कर्ज माफीच्या नावाखाली वसुली होत नसल्याने बँका अडचणीत आल्या आहेत. दोन वर्षे पूर्ण होऊनही कर्ज माफी थांबत नाही आणि कर्ज फेड नसल्याने नविन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या डॉ. दिपक सावंत यांनी आपल्याकडे आरोग्य मंत्रिपद असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागात आमूलाग्र बदल करणार अशी भिमगर्जना केली मात्र जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्द नाहीत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा मरणासन्न अवस्थेत आहे, परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत. सामान्य जनता महागाईच्या विळख्यात सापडली आहे. भाजी, तांदुळ, तसेच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही रेशनवर धान्य पुरावढा कमी केला, परंतू ते धान्यही खाण्यायोग्य नसते हे दुरभाग्य आहे. त्यामुळे या वास्तवाची माहिती तळागळातील जनतेपर्यंत आम्ही राष्ट्रवादीतर्फे पोहचवणार आहोत. आता या सरकारला फक्त मोदींचे नाव घेऊन मते मिळणार नाहीत. कारण राज्यात विकासात्मक बदल करणारेच हवेत. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचा पराभव अटळ असल्याचेही श्री. गावडे यांनी सांगितले.