सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
पाणी टंचाई निवारणार्थ मंजूर करण्यात आलेल्या ३१७ कामांपैकी आतापर्यंत केवळ १२६ कामेच पूर्ण झाली आहेत. तर १२३ कामे सुरु आहेत. ही कामे ३० जून पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती जिप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पाणी टंचाई निवारणासाठी तब्बल ५ कोटि रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. संभाव्य पाणी टंचाई आराखड्यातील ३१७ कामांची अंदाजपत्रके सादर करण्यात आली होती. त्या सर्व कामांना मंजूरी देण्यात आली होती. यातील २४९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यात विंधन विहिरी ५० कामे, विंधन विहीर दुरुस्ती ४०, विहीर खोल करणे व गाळ काढणे ८१, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती ७५, तात्पुरत्या पूरक नळपाणी योजना ३ अशा कामांचा समावेश आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्या २४९ कामांपैकी आतापर्यंत विंधन विहीर २०, विंधन विहीर दुरुस्ती ३२, विहीर खोल करणे व गाळ काढणे ६१, नळपाणी योजना दुरुस्ती १२, तर तात्पुरत्या पूरक नळपाणी योजना १ अशी एकूण १२६ कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १२३ कामे अद्यापही सुरु आहेत.
यावर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे पूर्ण करण्यास चांगलाच अवधी मिळाला आहे. पाणी टंचाईची कामे पुर्न करण्यास ३० जून पर्यंतची मुदत असल्याने सुरु असलेली १२३ कामे ३० जून पर्यंत पुर्ण होतील अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.