एकतर मत्स्यदुष्काळ जाहीर करा अन्यथा मत्स्यखात्याचा राजीनामा द्या…

2

मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत आम. नीतेश राणे आक्रमक….

मुंबई ता.२१:कोकणात मत्स्यदुष्काळाची गंभीर समस्या सध्या भेडसावत असून याकडे राज्य शासनाने,अधिकार्‍यांनी बारकाईने पाहण्याची वेळ आली आहे.एलईडी,पर्ससीननेटची मासेमारी,परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी,अंमलबजावणी कक्ष यासारख्या प्रश्‍नांवर गेली पाच वर्षे आवाज उठवूनही राज्य शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.मत्स्य खात्याचे मंत्री असलेल्या महादेव जानकरांना मासेमारी क्षेत्राविषयी काहीच माहिती नसल्यानेच या समस्या सुटलेल्या नाहीत.त्यामुळे येत्या काळात मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी एकतर मच्छीमारांना न्याय द्यावा अन्यथा आपले खाते ज्याला मत्स्यक्षेत्राची माहिती आहे त्यांच्याकडे द्यावे अशी जोरदार मागणी आमदार नीतेश राणे यांनी आज विधानसभेत केली.
ते म्हणाले, कोकणातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुठे चुकले असा प्रश्‍न मला पडला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील दुष्काळाची परिस्थिती मांडत किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. कोकणावासियांची एवढीच चूक आहे का? कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत. दहावी, बारावी कोकण बोर्डात विद्यार्थी प्रथम येतात. आमच्या शेतकरी एनपीए नसतो. तो पै पै फेडतो ही शेतकर्‍यांची, नागरिकांची चूक झाली आहे का? आमच्याच कोकणावर अन्याय का होत आहे हे विचारण्याची वेळ आली आहे.
दुष्काळ म्हटले की उर्वरित महाराष्ट्राकडे बघितले जाते आणि कोकणात सर्व काही आलबेल आहे. भरपूर पाऊस पडणे म्हणजे प्रश्‍न उरलेच नाही असे म्हणू शकत नाही. राज्य शासनाने, अधिकार्‍यांनी कोकणाकडे नीट पहावे. दुष्काळाची व्याख्या ही वेगवेगळी करू शकतो. मत्स्यदुष्काळाच्या समस्येकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. कोकणाची अर्थ व्यवस्था आंबा, काजू, पर्यटन, मासेमारी यावर अवलंबून आहे. कोकणातील मच्छीमारांसाठी त्यांच्या विकासासाठी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी पाच वर्षात काय केले हे सांगायला हवे. मच्छीमारांचे प्रश्‍न सुटत नाही, एलईडी प्रश्‍न सुटला नाही. परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई होत नाही. अंमलबजावणी कक्ष नाही.
विषयाचा गंध मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना नाही.
यामुळे यापुढे तरी मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात ज्यांना त्या क्षेत्राची माहिती आहे अशा व्यक्तीनाच मंत्रीमंडळात स्थान द्यावे. ज्यांना त्या क्षेत्राची माहिती नाही त्यांना मंत्रीपद देऊ नये. जानकरांना काहीच माहिती नाही. माशांचे पाच प्रकार सांगावेत. मच्छीमारांना न्याय, एलईडी प्रश्‍न सुटणार आहे का?
मत्स्यदुष्काळाच्या समस्येमुळे मच्छीमारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. संबंधित खात्याचे मंत्री केवळ बैठका घेत छायाचित्रे काढून प्रसिद्धी करत आहेत. प्रत्यक्षात एकही प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे या मंत्र्यांना प्रश्‍न विचारायचा का असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे एकतर मत्स्यदुष्काळ जाहीर करा अन्यथा राजीनामा द्या. तुम्हाला न्याय द्यायचा असेल तरच भाषणे करा. उर्वरित महिन्यात खाते दुसर्‍यांकडे द्या. माशांची माहिती असलेल्या व्यक्तीला खाते दिले गेल्यास मच्छीमारांना न्याय मिळेल असेही त्यांनी सांगितले.

3

4