ग्रामस्थांचा महावितरणला घेराव
वेल्डींग मशिन, कॉम्प्रेसर जळाल
कणकवली, ता.21 ः महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कलमठ बाजारपेठेत विद्युतभारीत वीज तार तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने त्याखाली कुणी पादचारी न आल्याने मोठी दुर्घटना टळली. तर वीज तर पडून एका टेम्पोच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याखेरीज कलमठ बाजारपेठेतील आबा गुडेकर यांच्या गॅरेजमधील कॉम्प्रेसर जळाला आणि ऑलविन फर्नांडिस यांच्या दुकानातील वेल्डिंग मशिन जळाली. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
वेल्डींग दुकानात आलेला टेम्पो चालक गाडी थांबवून दुकानात आल्यानंतर काही वेळातच वीज तार पडली. त्यामुळे सुदैवाने टेम्पो चालक देखील बचावला. कलमठ ग्रामस्थांनी बाजारपेठेतील जीर्ण विद्युत तारा बदलण्याची मागणी केली होती. मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतापलेल्या कलमठ ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराओ घातला. यामध्ये स्वाभिमान युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह हनुमंत बोंद्रे, सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा गुडेकर, ऑलविन फर्नांडिस, बाबा पारकर, पपू सावंत, अभी करंबेळकर, तोहसीन शेख, नंदू कोरगावकर आदींनी अभियंता श्री.भगत यांना धारेवर धरले. या चर्चेत जीर्ण विद्युत तारा बदलणे आणि नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही अभियंता श्री.भगत यांनी दिल्यानंतर कलमठ ग्रामस्थांनी घेराओ मागे घेतला.