भुईबावडा घाट असुरक्षितच!

2

पाच ठिकाणी संरक्षण भिंती धोकादायक; तब्बल तीन दिवसापूर्वी कोसळलेली दरड ‘जैसे थे’!

वैभववाडी/पंकज मोरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरवरून जोडण्यात महत्वपूर्ण भुईबावडा व करूळ या घाटांचा समावेश आहे. पावसाळ्यात हे दोन्ही घाट धोकादायक स्थितीत असतात. यावर्षी पहिल्याच पावसात भुईबावडा घाटाने ‘श्री गणेशा’ केला आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यावर दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले.

गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात गटारीत मोठी दरड कोसळली. तब्बल तीन दिवस होवूनही बांधकाम विभागाने दरड हटविली नाही. बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी पावसाळा आला की, भुईबावडा व करूळ घाटांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. यावर्षी भुईबावडा घाटासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. घाट रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत. काही ठिकाणी संरक्षण भिंती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र ज्याठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे. त्याठिकाणी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
घाटातील संरक्षण कठडेही अनेक ठिकाणी कोसळलेल्या स्थितीत आहेत. पावसाळ्यात ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्याठिकाणी संरक्षण जाळी बसविणे गरजेचे आहे. भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभावना आहे. गगनबावड्यापासून सुमारे पाच ते सहा कि. मी. अंतरावर संरक्षण भिंतीवर मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे गटारी तुंबली आहेत. मोठ्या पावसात रस्ता ‘ब्लॉक’ होण्याची दाट संभावना आहे. याही ठिकाणी सा. बां. ने कोणतीच उपाययोजना केलेली नाही.

4