आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश…
मालवण, ता. २२ : मालवणसह हडी, कोळंब, आचरासह अनेक गावांना जोडणार्या महत्त्वपूर्ण अशा कोळंब येथील नवीन पुलासाठी अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी गृह ग्रामीण वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर , सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या पाठपुराव्यास यश आले आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांची मालवणवासियांची मागणी पूर्ण झाली आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
मालवण- देवगड मार्गावर असलेले कोळंब पूल जीर्ण होऊन वाहतुकीस धोकादायक बनले होते. मालवण शहरासह कोळंब, हडी, आचरा येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पूल दुरुस्तीची मागणी केली होती. आमदार नाईक यांनी या मागणीची तत्काळ दखल घेत पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन सुमारे साडे चार कोटी रुपयांचा निधी गतवर्षी मंजूर करण्यात आला.
या कामाची टेंडर प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्चित करून कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याबाबत मालवणवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुरुस्त केलेला हा पूल पुन्हा काही वर्षांनी जीर्ण होणार असल्याने पुन्हा यासाठी नागरिक, ग्रामस्थांना त्रास होऊ नये यासाठी दूरदृष्टी असलेल्या आमदार नाईक यांनी कोळंब पुलाच्या दुरुस्तीवरच न थांबता याठिकाणी सुसज्ज मोठा पूल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आमदार नाईक यांनी पालकमंत्री केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे व पालकमंत्री केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून कोळंब येथे नवीन मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात तब्बल १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, जोडरस्ते बनविणे, भूसंपादन करणे यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही आमदार नाईक यांनी यावेळी दिली.