मालवण, ता. २२ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू यांच्यावतीने आणि इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्टस् या संस्थेच्या माध्यमातून वेळागर ते विजयदुर्ग या किनारपट्टी भागात पारंपरिक मच्छीमार, जलक्रीडा व्यावसायिक, महिलांना एक महिना कालावधीचे लाईफ सेव्हिंग, बोट हॅण्डलिंग याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे दीडशे जणांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गणेश कुशे, भाऊ सामंत, अमोल सावंत आदी उपस्थित होते. सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी ६० जणांना लाईफ सेव्हिंग, बोट हॅण्डलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मानव साधन विकास संस्था, जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिकांना एकत्रित करत प्रशिक्षण देत दोन वर्षाचा परवाना देण्यात आला. यावर्षी पुन्हा असे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वेळागर ते विजयदुर्ग या भागाचा सर्व्हे केल्यानंतर पर्यटन व्यवसाय वाढीसाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मानव साधन विकास संस्था, जनशिक्षण संस्था, लुपीन फाउंडेशनतर्फे उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली दीडशे जणांना मोफत लाईफ सेव्हिंग, बोट हॅण्डलिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे असे श्री. केनवडेकर यांनी सांगितले.
विजयदुर्ग, देवगड, तोंडवळी-आचरा, निवती वेळागर, शिरोडा याठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ जणांना प्रशिक्षण दिले जाणार असून हे प्रशिक्षण नारळी पोर्णिमेनंतर सुरू होणार आहे. यात महिलांना प्राधान्य असणार आहे. पारंपरिक मच्छीमार व इतरांना हे प्रशिक्षण असेल. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी दोन छायाचित्रे, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, पोहण्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणार्यांना दोन वर्षासाठीचा परवाना दिला जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १५ जुलैपूर्वी जनशिक्षण संस्था कुडाळ ०२३६२-२२३६६७ येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. केनवडेकर यांनी केले आहे.