दीपक केसरकर: बचत गट प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन
सावंतवाडी, ता.२३ : महिलांसाठी चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत अनेक योजना राबविल्या जात आहेत.त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या योजना राबविल्या गेल्यास वर्षभरात जिल्ह्यातील सर्व महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या दिसतील आणि तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित प्रज्वला योजनेअंतर्गत महिला बचत गटाचे प्रशिक्षण आज येथे घेण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे, माजी आमदार राजन तेली, प्रज्वल अध्यक्ष दिपाली मोकाशी, शलाका साळवी,मिनल मोहाडीकर,श्वेता कोरगावकर,निलम गोंदे,अन्नपुर्णा कोरगावकर,आनारोजीन लोबो,स्नेहा कुबल,सुचित्रा वजराटकर,संदीप नेमळेकर,वासुदेव नाईक,मेघश्याम काजरेकर,रुपेश राऊळ,वनिता कुलकर्णी,निलांगी रांगणेकर,भारती मोरे, आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले महिलांना सक्षम करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला आहे. यात शेळ्या-मेंढ्यां, कोंबड्या वाटप, अंडी उबवणी केंद्र योजनांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा फायदा महिलांना होणार आहे.
यावेळी सौ. मोकाशी म्हणाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी काही बड्या कंपनीशी टाईप करण्याचे काम सुरू आहे. ते झाल्यास आपले उत्पादन विक्री करण्यासाठी महिलांना वाट बघण्याची गरज नाही. यावेळी माजी आमदार तेली यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी जास्तीत जास्त त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा शासन त्यांच्या पाठीशी कायम खंबीर उभे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले.