दीपक केसरकर: ही योजना ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ ठरणार
सावंतवाडी, ता.२३ : कोंबडी पालन च्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच हजार महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. वर्षाकाठी एक लाख रुपयाचे रोजगार मिळणार आहे. त्यामुळे चांदा ते बांदा या योजनेतून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा घ्या, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या देशी गाई, शेळी मेंढी पालन योजनेचा लोकार्पण सोहळा आज श्री. केसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ही योजना यशस्वी करण्यासाठी मोलाचे काम करणा-या स्वर्गीय प्रकाश परब यांच्या पत्नी उमा परब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डाॅ. प्रसाद देवधर, राजन पोकळे, अशोक दळवी, रूपेश राऊळ, रवींद्र दळवी, अनिल जाधव, आत्माराम राऊळ, संजय शेटकर, बाबा मालवणकर, मानसिंग पवार, वैभव पवार आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सेंद्रिय खाद्य देऊन येथील गावठी कोंबड्या व त्यांची अंडी निर्माण करून या ठिकाणी महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. एका अंड्याची किंमत बाजारात चार रुपये असणार आहे तसेच या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कोंबड्या 330 अंडी घालणार आहे. त्याची संख्या 250 एवढी आहे उत्पादन वाढावे यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम महिलांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा आहे. त्यामुळे याचा फायदा महिलांनी घ्यावा; मात्र कोणी पाहुणा आला तर या कोंबड्या कापून आपले नुकसान करू नये, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, महिलांना बळकट करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी एक भावासारखा उभा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना बळकट करण्यासाठी आवश्यक त्या योजना राबवा अशा आपल्या सूचना दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी महिला सक्षम व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम आपण राबवत आहे. मी मोठ्या प्रमाणात निधी आणून दिला. मात्र त्याचा विनियोग कसा करावा हे आता महिलांनीच पहावे, असेही केसरकर म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर यांनी केले तर आभार श्री. पवार यांनी मानले. यावेळी मानसिंग पवार म्हणाले, जम्प नेटवर्कच्या माध्यमातून यासाठी महिलांना आवश्यक असलेले प्रशिक्षण व खाद्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा फायदा येथील महिलांनी घ्यावा.