गगनबावडा-खारेपाटण राज्यमार्गावरून एकेरी वाहतूक; दुपारनंतर वाहतूक पूर्ववत
वैभववाडी, ता.२३ : वैभववाडी तालुक्यात शनिवारी सायंकाळी धुवाधार पावसाने अक्षरशः कहर माजवला. या पावसाने भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे घाटमार्गातील वाहतूक रविवारी दुपारपर्यंत एकेरी सुरू होती. दुपारनंतर सा. बां. ने दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.
भुईबावडा-रिंगेवाडी पासून १. कि. मी. अंतरावर भुईबावडा घाटात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दरड व मोठे झाड उन्मळून कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक रविवारी दुपारपर्यंत एकेरी सुरू होती. दुपारनंतर बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. पहिल्याच पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. ठिकठिकाणी बुजलेली गटार, रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे घाटमार्गातील प्रवास जीवघेणा ठरत आहे.