आमदार वैभव नाईक ; ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार…
मालवण, ता. २३ : तालुक्यातील कोळंब पूलाच्या दुरुस्तीनंतर ते दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे गेले वर्षभर वाहनचालकांची तसेच स्थानिक ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर झाली. येत्या आठ दिवसात या पुलावरून एसटीसह अवजड वाहतूक सुरू होणार आहे असे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे सांगितले.
मालवण- देवगड तालुक्यास जोडणारे महत्त्वाचे कोळंब पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी स्थानिक ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मालवणात येण्यासाठी त्यांना खैदा-कातवड या खड्डेमय पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत होता. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाल्यानंतर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता.
गेल्या महिन्यात पुलाचे काम मार्गी लावल्यानंतर पहिल्या टप्प्यात दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली त्यानंतर चारचाकी वाहनांसाठी हे पूल वाहतुकीस खुले करण्यात आले. मात्र अद्यापही या पुलावरून एसटीसह अन्य अवजड वाहनांची वाहतूक सुरू न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात एसटीची वाहतूक सुरू होईल असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.