देवलीत साकारणार हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज…

2

आमदार वैभव नाईक यांची घोषणा ; दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार…

मालवण, ता. २३ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना खडतर मेहनत घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करणे गरजेचे आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या मालवणात लाखो पर्यटकांचा राबता असल्याने या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देता याव्यात म्हणून विद्यार्थ्यांसाठी पुढच्या वर्षी देवली येथे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी येथे केली.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तालुका शिवसेनेच्यावतीने आज दैवज्ञभवन सभागृहात दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबा सावंत, दीपा शिंदे, लता खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, पूजा तोंडवळकर, अंजना सामंत, बंडू चव्हाण, उदय दुखंडे, विजय पालव, दीपक राऊत, पराग खोत, अण्णा गुराम, प्रवीण लुडबे, प्रवीण रेवंडकर, गणेश कुडाळकर, किरण वाळके, गौरव वेर्लेकर, तपस्वी मयेकर, पंकज सादये, नंदू गावडे, भाऊ चव्हाण, धीरज केळुसकर, किशोर गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार झाला.
आमदार नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळेच दहावी, बारावी परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. सध्या स्पर्धेचे युग असून यात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना खडतर मेहनत घेण्याशिवाय पर्याय नाही. ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राचा फायदा कसा करून घेता येईल यादृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करायला हवी. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल बनविल्या आहेत. मतदार संघातील जास्तीत जास्त शाळांना विकासासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काळात उर्वरित शाळांनाह निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.
सौ. सावंत म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे पालकांनी जाणून त्यांना त्या क्षेत्रात जाण्याची संधी द्यायला हवी. आजची मुले ही सोशल मिडियाच्या जास्त आहारी गेल्याने अभ्यासात मागे पडत असल्याचे दिसत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर विद्यार्थ्यांनी गरजेपुरताच मोबाईलचा वापर करावा. श्री. खोबरेकर म्हणाले, कोणतेही क्लास न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. गरिबी शिक्षणाच्या आड येत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भविष्यात मुलांना करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक ते सहकार्य करू. सूत्रसंचालन करून अनंत पाटकर यांनी आभार मानले.

7

4