मतदार यादीतील नावे गायब झाल्याने ५६ मतदार मतदानापासून वंचित…
आचरा, ता. २३ : तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या पोटनिवडणूकीसाठी आज शांततेत मतदान झाले. प्रभाग तीनसाठी झालेल्या पोटनिवडणूकीसाठी ५४.७१ टक्के मतदान झाले. यात स्त्रिया २२६ व पुरूष २०९ यांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या सकाळी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.
या प्रभागातून सल्वादर मिरांडा, सचिन बागवे व राजेंद्र परब हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून ते आपले नशीब आजमावत आहेत. आज झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत मतदार यादीतील घोळाचा फटका मतदारांना बसला. प्रभाग तीन मधील मेस्त्रीवाडी भागातील ५६ मतदारांची यादीतून नावेच गायब झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदानापासून वंचित राहिल्याने या मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रभाग तीनमधील गाउडवाडी मधील ग्रामपंचायत सदस्य राजेश पडवळ यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी आज निवडणूक झाली. या जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात उतरले होते. ही निवडणूक चर्चेत राहिली ती मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होण्यामुळे, १७ फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभाग क्रमांक तीनमधील मतदार संख्या ८५१ होती. मात्र, आता जाहीर झालेल्या पोटनिवडणूकीसाठी जाहीर केलेल्या मतदारांची संख्या ही ७९३ होती. प्रत्येक निवडणूकीला मतदान करणाऱ्या ५६ मतदारांची नावेच यादीत नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आचरा येथील नारायण कुबल यांनी अर्जाद्वारे तहसीलदारांचे लक्षही वेधले होते. मात्र या प्रकारामुळे मेस्त्रीवाडी भागातील ५६ मतदार हे मतदानापासून वंचीत राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.