भोगवे-तेरावळे समुद्र किनाऱ्यावरील घटना
वेंगुर्ले : ता.२४ : तालुक्यातील वायंगणी येथील रमेश तुकाराम गिरप (वय ५४) हा भोगवे-तेरावळे समुद्र किनारी मासेमारी करीत असताना पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या बाबत निवती पोलीस स्टेशन मध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वायंगणी येथील रमेश गिरप यांच्यासह विनोद मोरजकर, नरहरी तोरसकर व चंद्रकांत म्हाकले असे हे चार ही जण भोगवे- तेरावळे समुद्र किनारी मासेमारी करण्यासाठी घरातून रविवारी पहाटे बाहेर पडले. मोटरसायकलने सकाळी ६ च्या दरम्याने किनाऱ्यावर पोहचल्यावर त्यांनी मासेमारी करण्यास सुरुवात केली. दरम्यान ७.३० वाजण्याच्या सुमारास रमेश मासेमारी करताना अचानक पाण्यात बुडताना विनोद मोरजकर याने पाहिले. मात्र त्याला हाक मारे पर्यंत रमेश पाण्यात पूर्ण बुडाला.
तत्काळ विनोद, नरहरी व चंद्रकांत यांनी पाण्यातुन रमेश याला बाहेर काढले. आणि उपचारा साठी प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे येथे आणले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला उपचारासाठी कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. या बाबत विनोद मोरजकर याने निवती पोलीस स्टेशनमध्ये या बाबत माहिती दिली असून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. या बाबत अधिक तपास पो.हे. कॉ. नाईक करीत आहेत. दरम्यान निवतीचे पोलीस अधिकारी श्री.साळुंके यांनी कुडाळ रुग्णालयात जाऊन या प्रकरणी माहिती घेतली असून शवविच्छेदन केले आहे. मात्र या शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.