करूळ-नावळे रस्त्यासाठी ३ कोटी ७० लाख मंजूर

145
2

मुंबई/प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील दुर्गम भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरलेला आणि गेली कित्येक वर्षे रखडलेला करूळ-नावळे-सडुरे-कुर्ली घोणसरे-फोंडा या रस्त्यासाठी यावेळच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ३ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सांगुळवाडी ,नावळे, सडुरे, अरुळे या दुर्गम भागाच्या विकासाला दळणवळणाच्या दृष्टीने चालना मिळणार आहे.

करूळ-नावळे-सडुरे-कुर्ली घोणसरे-फोंडा हा रस्ता गेले काही वर्षे रखडला आहे. करूळ नॅशनल हायवे ते करुळ खिंड पर्यंत तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. पुढे तेथून नावळे जिल्हा मार्ग पर्यंतच्या तीन किलो मीटरचे काम रखडले होते. यासाठी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे संदीप पाटील यांनी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील व अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठ पुरावा केल्याने आता हा रस्ता मार्गी लागणार आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग ६ मध्ये २/०० ते ५/५०० मध्ये डांबरीकरण करणे व सा.क्र,५/ ४०० मध्ये लहान पूल बांधणे. या कामासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच यावेळच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात २७ लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार हुस्नबानु खलिफे यांनी हा रस्ता मार्गी लागावा म्हणून तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
हा रस्ता पूर्ण होण्यासाठी पुढे करूळ -नावळे -फोंडा या मार्गावर सांगुळवाडी मगामवाडी जवळ आणखी एका पुलाचे काम पूर्ण झाले की हा मार्ग पूर्ण होऊन फोंडा ते करूळ नॅशनल हायवे पर्यंत जाण्यासाठी अंतर कमी तसेच वेळही वाचणार आहे. तसेच फोंडा-वैभववाडी-करूळ या मार्गाला पर्याय उपलब्ध होईल. आणि या परिसरातील दुर्गम भागाचा दळणवळणाच्या दृष्टीने विकास होईल.
तसेच खारेपाटण-तिथवली-भुईबावडा-गगनबावडा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ६५ लाख ३० हजार रुपये निधीची तरतूद झाली आहे.
तिरवडे तर्फे सौंदळ ते जिल्हा हद्द धालावल-कोर्ले वारंगाव नाधवडे -कोकिसरे -खांबाळे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ९ लाख ७२ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

4