आमदार राणेंच्या दणक्यानंतर दाखले वितरण सुरू

246
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तहसील कार्यालयाला अचानक भेट

कणकवली, ता.24 : कणकवली तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात विलंब होतोय. यात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता होती. ही बाब समजताच आमदार नीतेश राणे यांनी अचानक तहसील कार्यालयाला भेट दिली. तब्बल 400 हून अधिक दाखले प्रलंबित असल्याचे समजताच त्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदारांना धारेवर धरले. यानंतर तातडीने महसूल यंत्रणा हलली. आता पर्यंत इंटरनेटचा वेग कमी असल्याची कारणे दिली जात होती. पण राणेंच्या पुढ्यातच अवघ्या दहा मिनिटाच पंधरा दाखले देण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. यानंतर श्री.राणे यांनी स्टॅम्प वेंडर गॅलरी ते थेट दुय्यम निबंधक कार्यालयापर्यंत मोर्चा वळवला. राणेंच्या या अचानक इंट्रीमुळे संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली होती.
दरम्यान तहसीलदार संजय पावसकर, नायब तहसीलदार आर.जे.पवार यांना आमदार श्री.राणे यांनी कुठलाही दाखला प्रलंबित राहाता नये अशा सक्त सूचना दिल्या. तसेच तातडीने जादा कर्मचारी नेमा असे निर्देश दिले. यानंतर दाखल्यांच्या कामासाठी लिपिक वाढविण्यात आला. तर एका दाखल्यासाठी किती वेळ लागतो याची पाहणी श्री.राणे यांनी केली असता अवघ्या दोन मिनिटांत ऑनलाइन दाखला पूर्ण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंटरनेटची कारणे सांगू नका असे श्री.राणे यांनी ठणकावले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जवळ येत आहेत. त्यामुळे आणखी मनुष्यबळ वाढवा, नॉन क्रिमिलिअर, उत्पन्न दाखला, जातीचे दाखले, वय अधिवास आदींचे दाखले चार दिवसात द्या याबाबतची दिरंगाई खपवून घेणार नाही असा इशारा देखील आमदार श्री.राणे यांनी दिला. राणेंच्या या भेटीवेळी स्वाभिमान पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष राकेश राणे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, मंगेश सावंत, सोनू सावंत, संदीप सावंत, गौतम खुडकर, स्वप्निल चिंदरकर, संजय नकाशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

\