बसस्थानक परिसरातील प्रकार; संबंधिताला दिले पोलिसांच्या ताब्यात…
सावंतवाडी, ता. २४ : येथील बस स्थानक परिसरात युवतींना अश्लिल चित्रफित पाठवून मनात लज्जा निर्माण होईल असे इशारे करणाऱ्या एका युवकाला संबंधित युवतीच्या नातेवाईकांसह येथील नागरिकांनी बेदम चोप दिला. ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान संबंधित युवकाला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या युवकाकडून येथील बसस्थानक परिसरात गेले काही दिवस युवतींची छेडछाड करत असल्याचा प्रकार समोर आला होता तर दोन दिवसांपूर्वी काही युवतींनी त्याला चोप देऊन सोडले होते. परंतु त्याने हा प्रकार पुन्हा केल्याने याबाबतची माहिती पीडित युवतीने आपल्या नातेवाइकांनी दिल. त्यानंतर सापळा रचून त्याला आज पकडण्यात आले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू आहे.