अरुणा प्रकल्पग्रस्तांचे २७ रोजी धरणे आंदोलन

2

प्रकल्पग्रस्तांनी लेखी निवेदनाव्दारे तहसिलदारांना दिला इशारा

वैभववाडी,ता.२४:  अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने २७ जून रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषण, धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार वैभववाडी यांना लेखी निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
या निवेदनात त्यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाही. मोबदला नाही. पर्यायी शेत जमीनीचा पत्ता नाही. पुनर्वसन गावठाणात अदयाप प्राथमिक सुविधा नाही. असे असताना अप्पर जिल्हाधिकारी यांनी १७ जून रोजी गाव खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावणा-या अप्पर जिल्हाधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ? भर पावसात आम्ही जायचे कुठे ?राहायचे कुठे ?असा संतप्त सवाल करीत याचे उत्तर अप्पर जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्याने दिले पाहीजे.
प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश प्रशासनाला दिसत नाही. धरण समितीच्या पदाधिका-यांनी केसाने गळा कापला तर प्रशासनही ठेकेदाराच्या खाल्या मिटाला जागून प्रकल्पग्रस्तांवर अमानवी अत्याचार करीत आहे. असा आरोप करीत प्रसंगी धरणाच्या पाण्यात बुडून मरु पण गाव सोडणार नाही. असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आखवणे भोम गावात येणारी बंद असलेली एस.टी.बस सेवा सुरु करा. गावातील शाळा तात्काळ सुरु करावी. वैदयकीय सेवा सुरु ठेवावी. वीज पुरवठा सुरळीत करावा. रिंगीचा व्हाळ येथे मोरी बांधण्यात यावी. गावात जाणारा रस्ता वाहतूकीस योग्य करावा. बेकायदेशीर घळभरणीमुळे गावात पाणी भरत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा निचरा करावा. घळभरणीसाठी धरण समितीचे पुढारी व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या गैर व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावेत.या मागणीसाठी गुरुवारी २७ जून रोजी उपोषण धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे , रामचंद्र नागप, विलास कदम, सुर्यकांत नागप, प्रकाश सावंत, सुरेश नागप, वामन बांद्रे, ज्ञानदेव चव्हाण, अशोक बांद्रे सुरेश जाधव, अजय नागप, वसंत नागप, वासुदेव नागप, सदाशिव नागप, मंगेश नागप, अभिषेक कांबळे, विजय नागप, विनय नागप, दिपक सावंत आदी उपस्थित होते.

4