निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस…

177
2
Google search engine
Google search engine

साडे चार वर्षात काय केले याचा जाब जनतेने विचारावा ; परशुराम उपरकर

मालवण, ता. २४ : येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सत्ताधारी विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पाडत आहेत. घोषणांचा पाऊस पाडणार्‍या या सत्ताधार्‍यांनी गेल्या साडे चार वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचा जाब जिल्ह्यातील जनतेने विचारणे आवश्यक बनले आहे असे मत मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अमित इब्रामपूरकर, मोनिका फर्नांडिस, भारती वाघ, विल्सन गिरकर, आबा आडकर, गुरू तोडणकर, एकनाथ सावंत, रामकृष्ण सावंत, अंकुश ठाकूर, संदीप मेस्त्री, संकेत मेस्त्री आदी उपस्थित होते.
जनतेची मते मिळवण्यासाठी सत्ताधार्‍यांकडून नवनविन घोषणा केल्या जात आहेत. मात्र गेल्या साडे चार वर्षात त्यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत न होते त्यातच नव्या पुलासाठी १५ कोटीच्या तरतुदीची घोषणा केली गेली. परंतु यासाठी कांदळवन विभागाची परवानगी तसेच अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याची पूर्तता न करताच घोषणा करण्यात आली. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तालुक्यात सत्ताधार्‍यांकडून ज्या विकासकामांची पूर्तताच होणारच नाही अशा घोषणांचा पाऊस पाडला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत भूमिपूजन झालेल्या सात पुलांची कामे अद्यापही प्रलंबित असल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.
येथील तहसील कार्यालयातून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अधिकारी वर्ग आमदार वैभव नाईक यांचे ऐकत नाही. शहरातील वीज पुरवठ्याचा झालेला खेळखंडोबा दूर करण्याचे काम आमदार नाईक करणार का? नव्याने खासदार झालेले विनायक राऊत जिल्ह्यातील दूरध्वनीची समस्या आता तरी सोडवतील काय? याचा जाब जिल्ह्यातील जनतेने आमदार, खासदारांना विचारावा असे श्री. उपरकर यांनी सांगितले.