मालवण, ता. २४ : आचरा ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनच्या रिक्त पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार राजेंद्र परब यांनी १९७ मते मिळविताना ५३ मतांनी विजय मिळविला. मतमोजणीची प्रक्रिया आज येथील तहसील कार्यालयात पार पडली.
गाऊडवाडीतील ग्रामपंचायत सदस्य राजेश पडवळ यांच्या निधनामुळे प्रभाग क्रमांक तीनचे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी काल मतदान प्रक्रिया झाली. यात ५४.७१ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत सल्वादर मिरांडा, सचिन बागवे, राजेंद्र परब यांच्यात लढत होती. त्यामुळे या रिक्त पदावर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण आचरावासियांचे लक्ष लागले होते. येथील तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यात राजेंद्र परब यांना १९७ मते, सल्वादर मिरांडा याला १४४ तर सचिन बागवे यांना ९० मते मिळाली. शिवसेना पुरस्कृत उमेदवार राजेंद्र परब हे विजयी झाल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी पवार यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर आदी उपस्थित होते.
निवडीनंतर तालुका शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, विनायक परब, सतीश बागवे, जयप्रकाश सावंत, राजू नार्वेकर, नंदू लाड, सतीश सावंत, विवेक परब, नीलेश परब, संजय परब, पपू परब, राजेंद्र परब यांच्यासह आचर्यातील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. आचऱ्यातही शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला