केर ग्रामस्थांची मागणी : वनअधिकार्यांना घेराव
दोडामार्ग, ता. 24 : तालुक्यात धुडगूस घालणार्या हत्तींचा योग्यतो बंदोबस्त करा. त्यांना पकडण्यासाठी मोहिम राबवा, अन्यथा उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा केर ग्रामस्थांनी आज वनविभागाला दिला आहे.
गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी आपल्या सहकार्यांसमवेत आज वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांना घेराव घातला. यावेळी उपसरपंच महादेव देसाई, मोहन देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी श्री. गमरे यांना जाब विचारला. गेले अनेक दिवस हत्ती दोडामार्ग तालुक्यात वास्तव्यास आहेत. हत्तींचा कळप भरदिवसा वस्तीत येत आहेत. काही दिवसापूर्वी हत्तींकडून एसटी थांबविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे हत्तींकडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकिकडे नुकसान भरपाई देण्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र हत्ती आक्रमक झाल्यास त्यांच्याकडून जिवीतहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला. तसेच राजरोस फिरणार्या हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने तात्काळ योग्यती उपाययोजना आखावी. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला.