शासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनीच केली साकवाची डागडुजी…

2

उपसरपंच वायंगणकर यांनी घेतला पुढाकार…

आचरा, ता. २४ : वर्षभरापूर्वी मोडून पडलेल्या हिर्लेवाडी तांबळवाडी साकवासाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आचऱ्यातील ग्रामस्थांनी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत बांबूचा आधार घेत साकवाची डागडुजी केली.
आचरा हिर्लेवाडी भागात येथील मुख्य रस्त्यापासून तांबळवाडी भागात जाण्यासाठी वीस वर्षांपूर्वी साकव बांधला होता. डिसेंबर २०१८ मध्ये या साकवावरुन ग्रामस्थ गुरे घेऊन जात असताना तो अचानक मोडला. यामुळे तांबळवाडी भागातील वीस ते पंचवीस घरांचा मुख्य वाडीशी संपर्क तुटला. याचा फटका ग्रामस्थांबरोबरच विद्यार्थ्यांनाही बसला होता. त्यामुळे साकव उभारण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने बांबू, सुपारीच्या झाडाच्या सहकार्याने साकवाची तात्पुरती डागडुजी करून तांबळवाडी ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय दूर केली.

4