सभापती सोनाली कोदे आक्रमक ; झडपे न काढल्यास ल.पा. कार्यालयावर धडक देण्याचा इशारा
मालवण, ता. २४ : कांदळगाव येथे नदीमधील झडपे न काढल्याने सुमारे अडीचशे ते तीनशे हेक्टर क्षेत्रात खारे पाणी घुसले आहे. परिणामी भातशेतीची जमिन नापिक बनण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गंभीर समस्येबाबत सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक भूमिका घेत कणकवली येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. उद्यापर्यंत ही झडपे न काढल्यास ग्रामस्थांसह कार्यालयावर धडक देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरनजीकच्या सुमारे सहाशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. तेथील नदीमध्ये लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने झडपे बसविली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही झडपे काढणे आवश्यक असतानाही संबंधित विभागाकडून याची कार्यवाही झाली नाही. परिणामी गेल्या काही दिवसात नदीपात्रातील खारेपाणी भातशेतीच्या सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रात घुसले आहे. पावसाला सुरवात झाल्याने झडपा न काढल्याने सर्व खारे पाणी भातशेती जमिनीत घुसल्यास ती नापिक बनण्याची तसेच शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या समस्येबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सभापती सोनाली कोदे यांचे लक्ष वेधत तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवावी अशी मागणी केली. त्यानुसार सभापती कोदे यांनी याप्रकरणी माहिती घेतली असता ज्या ठेकेदाराने ही झडपे बसविली होते. त्याचे बिल लघुपाटबंधारे विभागाने अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत बिल दिले जात नाही तोपर्यंत झडपे काढणार नसल्याची भूमिका त्या ठेकेदाराने घेतली आहे. याकडे लघुपाटबंधारे विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न केल्याने आज सभापती कोदे या आक्रमक झाल्या. त्यांनी कणकवली येथील लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. हिंगमिरे यांचे लक्ष वेधत जाब विचारला. कोणत्याही परिस्थितीत उद्यापर्यंत नदीतील झडपे काढण्याची कार्यवाही करावी अन्यथा कार्यालयावर ग्रामस्थांसह धडक देऊ असा इशारा सौ. कोदे यांनी दिला.