व्यापारी संकुलासाठी ओरोसमधील व्यापारी आक्रमक

2

पालकमंत्र्यांना आश्वासनाचा विसर :1जुलैपासून बंदचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, ता .२५ :  मुंबई-गोवा महामार्ग कामामुळे विस्थापित झालेल्या ओरोस दुकानदारांनी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाकडे व्यापारी संकुलाची मागणी केली होती. २६ जानेवारी २०१८ रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत पुढील सहा महिन्यात प्राधिकरण क्षेत्रातील भूखंड क्र. ४८ मध्ये व्यापारी संकुल बांधण्याचे आश्वासीत करण्यात आले होते. मात्र, त्यावर १७ महिने उलटले तरी प्रशासनाने कागदोपत्री सोपस्कार सुद्धा पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथील व्यापारी असोसिएशन ओरोस बुद्रुक हि संघटना आक्रमक बनली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत १ जुलै पासून दुकाने बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदारीकरणात ओरोस फाटा येथील सर्वच दुकानदार विस्थापित झाले. त्यांच्या दुकानांची जागा या महामार्गात गेल्याने व्यवसाय कसा करावा ? असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. त्यावेळी व्यापारी असोसिएशनने ओरोस फाटा येथे प्राधिकरणने उभारलेल्या आठवडा बाजार शेडमध्ये तात्पुरती सोय करावी, अशी मागणी केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी सुद्धा हीच मागणी लावून धरल्याने प्राधिकरणने हि मागणी मान्य केली.
त्यामुळे यातील थोड्या व्यावसायिकांची सोय झाली. तर अनेकांना खाजगी सुविधा निर्माण करावी लागली. आठवडा बाजारात उभारण्यात आलेली पत्र्याची शेड वापरण्यास देण्यात आली असली तरी हि सोय तात्पुरती आहे. त्यामुळे व्यापारी असोसिएशनने सर्व व्यापाऱ्यांसाठी प्राधिकरण क्षेत्रातील ४८ नंबरच्या भूखंडात व्यापारी संकुल उभारावे, अशी मागणी लावून धरली. त्यानुसार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी बैठक घेत चर्चा घडविली. यावेळी पुढील सहा महिन्यात मागणीनुसार व्यापारी संकुल उभारण्यात येईल, असे आश्वासीत करण्यात आले होते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेत याबाबत आठवण करून दिली होती. मात्र, १७ महिने उलटले तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सोडाच कागदोपत्री सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २७ जून पर्यंत हि कार्यवाही पूर्ण करून काम सुरु न झाल्यास १ जुलै पासून दुकाने बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा व्यापारी असोसिएशनने दिला आहे.
यावेळी अध्यक्ष महेश पारकर, उपाध्यक्ष पांडुरंग मालवणकर, सचिव महादेव राणे, निलेश परब, ए. आर. सुतार, आनंद बागवे, धनंजय गावडे, अतुल आंबडोसकर, मनस्वी परब, रश्मी साने, आनंद पिंगूळकर आदी व्यापारी उपस्थित होते.

11

4