विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ‘हमाली’ करणार नाही

2

एम. के. गावडे : जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकार्‍यांची ‘तिखट भूमिका’

सावंतवाडी, ता. 25 : मागच्या काही काळात काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला संपविण्याचे काम केले. त्यामुळे आता येणार्‍या निवडणुकीत आम्ही त्यांची हमाली करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांनी आज येथे आयोजित जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला.
काही झाले तरी येणार्‍या काळात जिल्ह्यातील तीनही जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोण इच्छुक नसेल तर मी स्वतः उभा राहीन. बाहेरचा उमेदवार नको, असा टोला भाई सरवणकर यांनी लगावला.
जिल्हा राष्ट्रवादीचा मेळावा आज येथे झाला. यावेळी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील, जिल्हा निरीक्षक अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, नम्रता कुबल, अमित सामंत, उदय भोसले, भास्कर परब, विजय कदम, शिवाजी ढवळे, आत्माराम ओटवणेकर, चंद्रकांत पाताडे, सत्यजित धारणकर, प्रमोद धुरी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उभ्या असलेल्या उमेदवारांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. साधा फोनसुद्धा केला नाही. त्यांच्याच खुर्च्या आम्ही का उचलायच्या असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. काही झाले तरी पक्षाने संघटना बांधण्यासाठी प्रयत्न करावेत. स्वबळावर निवडणूक लढवावी. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, असे यावेळी सरवणकर यांनी सांगितले. कोणी उमेदवार मिळत नसेल तर मी स्वतः निवडणूक लढवेन असेही त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी मागच्या निवडणुकीत काय नुकसान झाले यापेक्षा आता पुढील कोणता निर्णय घ्यायचा याचे नियोजन करा असे यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून सुचविण्यात आले.

20

4