आ. वैभव नाईक यांच्यावर रिव्हॉल्वर रोखणाऱ्याची निर्दोष मुक्तता

2

 

सिंधुदुर्गनगरी, ता. २५ : शिवसेना आमदार व तत्कालीन निवडणूक उमेदवार वैभव नाईक यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी अनिल पांडुरंग रांबाडे (३२) व विशाल अमृत पालव (३०, दोन्हीही रा .भांडूप) यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्यावतीने वकील संग्राम देसाई आणि सुहास साटम यांनी काम पाहिले.

१३ ऑक्टोंबर २००९ रोजी विधानसभा निवडणूक मतदानादिवशी कुडाळ – मालवण मतदारसंघाचे तत्कालीन शिवसेना उमेदवार वैभव नाईक हे आपल्या कोरोला कंपनीची (एम.एच. ०७. ९४५) गाडीतून आपल्या मतदार संघातील मतदान केंद्रांना भेटी देत होते. दरम्यान त्यांना माणगांव खोऱ्यातील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे नाईक हे कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी माणगांव खोऱ्यातील शासकीय रुग्णालयात गेले होते. शासकीय रुग्णालयातून त्यांची विचारपूस करून परतणाऱ्या वैभव नाईक यांच्या गाडीसमोर संशयित अनिल पांडुरंग रांबाडे व विशाल पालव यांनी आपली गाडी समोर उभी करून संशयित अनिल रांबाडे यांनी नाईक यांच्यावर रिव्हॉल्वर रोखत संगनमताने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रांबाडे यांनी बंदी आदेश असताना स्वतः जवळ विनापरवाना रिवॉल्व्हर राऊंडसह बाळगुण बंदी आदेशाचा भंग केला असल्याची तक्रार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीसात दिली होती. त्यानुसार संशयितां विरोधात भादंवि ३०७, ३४१, ३४ सह भाहअक ३/२५, मुपोकाक ३७ (१)/१३५ अन्वये कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीतांना अटक करून न्यायल्यासमोर हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी आणि त्यांनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर संशयीतांना जामीन मंजूर झाला होता.

याप्रकरणी न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. तसेच सदरप्रकरणी संशयितांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, त्यांना नाहकरित्या गोवले असल्याचा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. त्यामुळे वरील दोन्ही संशयीतांची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

12

4