डागडुजी न केल्यास आंदोलन : आशिष सुभेदार यांचा इशारा
सावंतवाडी, ता. 25 : सुशोभिकरणामुळे राज्यात चर्चा झालेल्या सावंतवाडी पालिकेच्या मच्छीमार्केटची दोन वर्षातच दुरावस्था झाली आहे. मार्केटमधील फरशा फुटल्या असून त्या ठिकाणी येणार्या लोकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत आहे. याबाबत येथील मच्छीमार विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर लोकांना होणारा त्रास लक्षात घेता तात्काळ डागडुजी करण्यात यावी,अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेचे युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
या मच्छी मार्केटचे नुतनीकरण करून अवघी दोन वर्ष पार पडली आहेत.मात्र या दोन वर्षातच आतील फरश्या मोठ्या प्रमाणात फुटल्या आहेत.या कामाच्या संबंधित ठेकेदाराने काम करते वेळी कामात दिरंगाई केल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे.तर मार्केट सुरू असताना ओट्याच्या फरश्या तुटून खाली पडण्याचा प्रकार सुध्दा घडला आहे.मात्र सुदैवाने यात कोणाला इजा न झाल्याचे येथील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
या प्रकाराबाबत सर्व मच्छी मच्छी विक्रेत्या मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तर फुटलेल्या फरशांच्या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे नागरिकांमधून सुद्धा संताप व्यक्त होत आहे.या मार्केटमध्ये एकूण ५६ गाळे आहेत.या प्रत्येक गाळ्यामागे पालिकेकडून कडून दिवसाला देखभालीसाठी १२० रुपये घेतले जातात मात्र ते खर्च होत नाहीत मग जातात तरी कुठे असा सवाल यावेळी बोलताना श्री. सुभेदार यांनी उपस्थित केला.