दखल घ्या, अन्यथा टाळे ठोकू : सागर नाणोसकर यांचा इशारा
सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. 25 : जिल्ह्यातील आठ आयटीआयचा कारभार एकाच प्राचार्याकडून हाकला जात असल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारात उघड झाली आहे. विशेष म्हणजे बदली होवूनसुद्धा त्या प्राचार्याकडून हे नऊ ठिकाणचे चार्ज मागून घेण्यात आल्याचे समजते.
याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी सागर नाणोसकर यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान आठ ठिकाणच्या प्राचार्यांची पदे तात्काळ भरण्यात यावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व आयटीआयना टाळे ठोकू असा इशारा त्यांनी दिला आहे. उद्या याबाबत लक्ष वेधण्यासाठी ते जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यात आठ आयटीआय संस्था आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत हणमंत पाटील हे एकच प्राचार्य कार्यरत आहेत. त्यांची बदली यापूर्वी विक्रमगडला झाली होती. परंतू ती रद्द करून त्यांनी या ठिकाणी रहाणे पसंत केले. त्यांच्याकडून गेले काही दिवस मनमानी सुरू आहे. वॉचमन लोकांना धमकावून त्यांच्या ड्युट्या बदलून घेणे. तासिका तत्वावर काम करणार्या कर्मचार्यांच्या मानधनात कपात करणे, नियमाप्रमाणे पगार न काढणे, एका कर्मचार्यावर दोन चार्ज देणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. श्री. पाटील यांनी गेल्या वर्षात विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूव घेतलेले नाहीत. जिल्ह्यात कंपन्या नाहीत असे सांगून ते आपल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्यतो निर्णय घेवून त्यांची बदली करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा श्री. नाणोसकर यांनी दिला आहे.