कासार्डे जांभूळवाडी येथील अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार

2

ट्रकला ओव्हरटेक करणार्‍या कारची धडक

कणकवली, ता. २५ : मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे जांभूळवाडी येथे ट्रकला ओव्हरटेक करताना स्कोडा कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर असलेले संदीप सोमाजी पाताडे (वय 36, रा. कासार्डे दक्षिण गावठाण) जागीच ठार झाले. याप्रकरणी प्रकाश संभाजी पाताडे यांनी येथील पोलिस ठाण्यात स्कोडा चालका विरोधात तक्रार नोंदवली आहे.
स्कोडा गाडी चालक प्रवीण कुमार शेट्टी हे तळेरे ते कणकवलीच्या दिशेने येत होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी आयशर ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्कोडा गाडीची धडक समोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून येणारे संदीप पाताडे यांना बसली. यात संदीप पाताडे रस्त्याकडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला तसेच हाता पायाला जखमा झाल्याने ते जागीच ठार झाले. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश भोसले, हवालदार बसत्याव पिंटो, प्रसाद नाईक, पोलिस नाईक प्रकाश गवस, चालक विष्णू सावळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक सुरळीत केली.

4