जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढपट्टे
सिंधुदुर्गनगरी, ता. २६: समाजातील सर्व स्तरातील जनतेच्या कल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी क्रांतीकारी निर्णय घेतले. कृषि, शिक्षण, आरक्षण, सहकार आदी क्षेत्रात समाजोपयोगी कायदे व निर्णयाद्वारे आणि त्याची सुयोग्य अंमलबजावणी करुन राजर्षी शाहूंनी सर्वार्थाने रयतेचा राजा याची प्रचिती जगासमोर ठेवली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन चरित्र सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त व समाजिक न्याय दिना निमित्त येथील सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ओरोसच्या सरपंच सौ. प्रिती देसाई, जात पडताळणी उपायुक्त प्रमोद जाधव, दलितमित्र बळवंत खोटलेकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, नवनाथ जाधव, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर उपस्थित होते.
२ एप्रिल १८९४ रोजी राजर्षीी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर लगेच त्यांनी वेठबिगारी पद्धत बंद केली. बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला, असे सांगून डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, मोतीबाग तालिम सुरू करुन कुस्तीस चालना दिली. संस्थानामधील नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याचा आदेश १९०२ मध्ये काढला. तत्कालिन प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षींनी अनेकविध कल्याणकारी निर्णय घेतले. आज १०० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व कल्याणासाठी त्यांची दूरदृष्टी अगाध होती.
श्री. नवनाथ जाधव यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहूंच्या कारकिर्दीतील विविध प्रसंगांच्या अनुषंगाने विविध कल्याणकारी निर्णयांचे सविस्तर विवेचन केले.
सामाजिक न्याय दिना निमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे विद्यालयीन स्तर दिक्षा सुमंत तोंडवलकर प्रथम क्रमांक, इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण, द्वितीय क्रमांक वेदिका नाईक, मुलींचे शासकीय वसतीगृह, वेंगुर्ला, तृतीय ओमकार कोचरेकर मुलांचे वसतीगृह, वेंगुर्ला, महाविद्यालयीन स्तर प्रथम – मनाली गुरुनाथ नेरुरकर, मु.पो. जांभवडे, ता. कुडाळ, द्वितीय- अमृता अशोक गवस, मुलींचे शासकीय वसतीगृह, सावंतवाडी, तृतीय – सुरज रविंद्र यादव, मुलांचे वसतीगृह, कणकवली.
प्रारंभी दीप प्रज्वलन व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारंभाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन आनंद करपे यांनी केले.