ब्रिगेडियर डोग्रा यांची उदघाटन प्रसंगी माहिती…
सिंधुदुर्गनगरी ता.२६:महाविद्यालयीन जीवनात संरक्षण दलाची ओळख करुन देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच ‘एनसीसी’चा समावेश आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत जिल्ह्यातील १६ महाविविद्यालयांमध्ये १८ ठिकाणी एनसीसी शाखा सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय छात्रसेनच्या कोल्हापूर हेडक्वार्टरचे प्रमुख ब्रिगेडियर आ.बी. डोग्रा यांच्या हस्ते या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री. डोग्रा यांनी कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या पाठबळाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील १६ महाविद्यालय तसेच २ उपशाखा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आर.पी. गोगटे महाविद्यालय – बांदा, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय – फोडांघाट, छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय ओरोस, एस.एच. केळकर कला व विज्ञान महाविद्यालय देवगड, लक्ष्मीबाई सिताराम हेबाळे महाविद्यालय-दोडामार्ग, आनंदीबाई रावराणे कला व वाणिज्य महाविद्यालय वैभववाडी, डॉ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय-वेंगुर्ला, जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली-सावंतवाडी, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल-आंबोली, श्री. माधवराव पवार विद्यालय, कोकीसरे-वैभववाडी, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय-सांगेली – सावंतवाडी, शिवाजी इंग्लिंश स्कूल-पणदूरतिठ्ठा, कुडाळ, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट, विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला-कणकवली, शिवाजी मेमोरिअल हायस्कूल, कणकवली, माध्यमिक विद्यामंदीर कनेडी या महाविद्यालयांमध्ये शाखा व आर.पी. गोगटे महाविद्यालय बांदा आणि एस.एच. केळकर महाविद्यालय देवगड येथे उपशाखा सुरू करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसूलकर हायस्कूल सावंतवाडी येथील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सेकंड ऑफिसर गोपाळ गवस या विद्यार्थ्याला यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमावेळी कमांडिग ऑफिसर देवेन भारद्वाज यांनी राष्ट्रीय छात्र सनेच्या कामाबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय सेवेतील महत्व, उद्देश व संधी विषयी माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.