जयंत पाटील यांची मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विधानसभेत मागणी…
मुंबई ता.२६: मराठा समाजातील विद्यार्थी एसी,बीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत मात्र त्या विद्यार्थ्यांना ३० जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय धरण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत केली.
मराठा समाजातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी एसी, बीसी प्रवर्गातून अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली की नाही हे पाहिले जाते. त्यात जातपडताळणी प्रमाणपत्र उशिरा मिळते. ज्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी साठी अर्ज केले आहे त्यांनी टोकन घेतले आहे ते टोकन ग्राहय धरावे असेही जयंतराव पाटील म्हणाले.
मात्र विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत सर्व कागदपत्रे फॅसिलिटेशन सेंटरमध्ये पडताळणी करण्यासाठी जमा करावे असे सांगितले जात आहे ही बाब संबंधित मंत्र्यांच्या जयंतराव पाटील यांनी लक्षात आणून दिली.
मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळण्यापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा कालावधी देवून त्यांच्याकडून प्रमाणपत्र दाखल करुन घ्यावे असे आदेश द्यावेत अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली.