योगेश नाईक : आशिष सुभेदारांच्या टीकेवर युवासेनेचे प्रत्युत्तर
सावंतवाडी, ता. 27 : सत्तेत असतानासुद्धा चुकीच्या ठिकाणी विरोध करण्याची धमक फक्त शिवसेनेत आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आपले पक्ष भाड्याला दिले अशा लोकांनी शिवसेनेवर टीका करणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर युवासेनेचे तालुकाध्यक्ष योगेश नाईक यांनी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांना दिले आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. यात असे नमुद केले आहे की, जिल्ह्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत अशी मागणी आम्ही जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. परंतू त्या मागणीनंतर श्री. सुभेदार यांनी आमचे उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आज श्री. नाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधाला विरोध करण्याची सवय आमची नाही. जे काही चुकीचे होत असेल त्याला सत्तेत असतानासुद्धा विरोध करण्याची ताकद फक्त शिवसेनेत आहे. त्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी सुभेदार यांनी नाणोसकर व शिवसेनेवर टीका करणे अयोग्य आहे, असे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.