मिनी पर्ससीन व पारंपरिक मच्छीमार वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

285
2

 

मुंबई, ता. २७ : मिनी पर्ससीन व पारंपरिक मच्छीमार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या समिती गठित करून दोन्ही मच्छीमारांना समितीमध्ये स्थान द्यावे अशी मागणी भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
याबाबत असे निवेदन त्यांनी श्री. फडणवीस यांना दिले. यावेळी वेंगुर्ल्यातील स्थानिक मच्छिमार उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. सदर तालुक्यात पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणारे 80 ते 90 टक्के मच्छीमार यांनी मिनी पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे. मिनी पर्ससीन मासेमारीमुळे समुद्री पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होते. सदर पद्धतीने मासेमारी केल्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे व त्या समुद्रात मोठ्या प्रमाणात पोलंन (चिंगूळ) व तारली मासळीही ठरावीक हंगामात नव्याने येते. ही मासळी आकाराने लहान असल्याने मिनी पर्ससीन, रिंगसीन जाळीच्या सहाय्याने पकडावी लागते. याखेरीज दुसरी पद्धत येथे उपलब्ध नाही. तरी सदर पद्धत न अवलंबल्यास परप्रांतीय बोटींचा फायदा होतो. तरी वेंगुर्ला तालुक्यांमध्ये मिनी पर्ससीन मासेमारी पद्धतीने मासेमारी करण्यास मान्यता द्यावी तसेच याबाबत राज्य शासनाची समिती गठीत करावी व सर्व मच्छीमार व्यवसायाचा योग्य सर्वे करून पारंपारिक व मिनी पर्ससीन या दोन्ही गटातील मच्छिमारांना सदर समितीत स्थान देऊन समान न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

4