जिल्हा बँकेचा १ जुलैला ३६ वा वर्धापनदिन

245
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कट्टा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, ता.२७ : ‘विना सहकार नाही उध्दार’ हे ब्रीद वाक्य जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून राष्ट्रिय बँकांशी स्पर्धा करत आपली यशस्वी घोडदौड़ सुरु असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ३६ वा वर्धापन दिन १ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त बँकेच्या विविध शाखांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ओम साई गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांना शेती व सहकार विषयावर मार्गदर्शन केले जाणार असून या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे आहे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
सहकार चळवळीत सामान्य माणूस केंद्रभूत मानून महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली, पण जागतिकीकरणानंतर अनेक आर्थिक स्थित्यंतरे झाली. मात्र सहकार चळवळ अविरत सुरूच राहिली. या चळवळीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीनंतर १ जुलै १९८३ ला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. आज या सिंधुदुर्ग बँकेची नाळ ही सामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार आणि शालेय मुलांशी जुळली गेली आहे. सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव पासून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यापर्यंत सिंधुदुर्ग बँकेने आपल्या प्रगतीची पायरी गाठण्यासाठी आजवरच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने जागतिक मंदीपासून नोटाबंदी पर्यंत अनेक वादळे पेलली. सिंधुदुर्ग बँकेने ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य जोपासत राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत वाटचाल सुरू ठेवलेली आहे. या बँकेचा १ जुलै रोजी ३६ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.
बँकेने ३६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये बँकेच्या ९१ शाखांमार्फत शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देणे. तसेच २५०० काजू रोप वाटप करण्याचे ठरविले आहे. तसेच या दिवशी ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे दुपारी ३ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी २०१९ मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत जिल्ह्यांमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा व बँकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या मुलांनी या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेले आहे. त्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच शेती व शेतीपूरक क्षेत्रात उत्तम कामकाज करत असलेल्या शेतकऱ्यांना गौरविले जाणार आहे. या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीविषयक तसेच बँक कर्ज योजना विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या शेतकरी मेळाव्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले आहे.

\