नगराध्यक्ष साळगावकर आक्रमक:अधिका-यांनी आर्थिक मागणी केल्याचा आरोप
सावंतवाडी, ता. २७ : येथील पालिकेच्या मोती तलावात स्कुबा डायव्हींग आणि बोटिंग सुरू केल्याच्या चार तासानंतर मेरीटाइम बोर्डाकडून ही सेवा बंद पाडण्यात आली आहे.
गोसावी नामक अधिकाऱ्याने त्या ठिकाणी येऊन आपल्याला कॅप्टन सुरज नाईक यांनी पाठवले आहे. त्यामुळे हे बोटींग व स्कुबा ड्रायव्हिंग तात्काळ बंद करा, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करून दहा हजार रुपये दंड करू अशी धमकी दिली. तसेच हा प्रकार तडजोड करण्यासाठी आर्थिक मागणी केली असा आरोप साळगावकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, अशाप्रकारे तात्काळ मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी दखल घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. अन्य कामे असताना पर्यटनाच्या उपक्रमात असा खोडा घालणे योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे आर्थिक मागणी करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रसंगी आपली आंदोलनाची भूमिका आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेरिटाईम बोर्डाचे मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार सुरेश प्रभू यांच्या आपण निवेदनाद्वारे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अन्नपुर्णा कोरगावकर, सुरेद्र बांदेकर, आनंद नेवगी उपस्थित होते.